ग्रामपंचायत सरपंच
अपात्र नियम Gram Panchayat Sarpanch Apatra Niyam Marathi
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्याने ज्याप्रमाणे, ग्रामपंचायतीला बळकटी देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहेत. व त्याचप्रमाणे, ग्रामपंचायतीचा कारभार सुव्यवस्थेचा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असेलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना कायद्याच्या चौकटीत राहून आणि कायद्याने निर्गमित केलेले पात्रतेचे निकष कायम ठेवून कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडावी लागतात. असे कर्तव्य पार पाडत असताना सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी कसूर केल्यास संबंधितास अपात्रतेची (निरर्हता) तरतूद देखील कायद्यात करून ठेवली आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्यापूर्वी किंवा निर्वाचित (निवडून आलेले) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असेलेले सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ मधील तरतुदीनुसार तसेच अधिनियमात वेळोवेळी निर्गमित केलेल्या कलमांअंतर्गत पुढील बाबींसाठी आपल्या अधिकार पदावरून अपात्र Gram Panchayat Sadasya Apatra ठरविले जाऊ शकतात.
सदस्य, उपसरपंच, सरपंच अपात्रतेचे निकष:
• ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या कोणत्याही करारात स्वतः किंवा भागीदारांमार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या हिस्सा किंवा हितसंबध (वैयक्तिक फायद्यासाठी गुप्त कारण उदा. पैसा किंवा सत्ता) गुंतले असल्यास सरपंच, उपसरपंच, सदस्य अपात्र ठरवता येते. (कलम १४ छ).
• अस्पृशता अधिनियम, १९५५ किंवा मुबंई दारूबंदी अधिनियम, १९४९ किंवा तत्सम कायद्याखाली दोषी ठरविल्या असल्यास अशी व्यक्ती ग्रामपंचातीची कोणतेही पद धारण करण्यास अपात्र ठरते. (कलम १४ क - एक).
• ग्रामपंचायतीचे किंवा जिल्हापरिषदेला देणे असलेले कर किंवा फी रक्कम मागणी केल्यापासून तीन महिन्यांच्या आत भरण्यास कसूर केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचेवर अपात्रतेची कार्यवाही करता येते. (कलम १४ -ज).
• परकीय राज्याचे नागरिकत्व स्वीकारल्यास सदर व्यक्ती ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य राहण्यास अपात्र ठरवता येते. (कलम १४-त्र).
• दोन पेक्षा जास्त अपत्य असतील (१२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले) तर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच म्हणून राहण्यास पात्र राहणार नाही किंवा अपात्र ठरविण्यात येतील. (कलम १४ त्र -१).
• जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यास अशी व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात येते. जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती पदावर निवडून आल्यास त्वरित एका पदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. (कलम १४ ज-२).
• शासकीय जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केले असल्यास अशा व्यक्तीस (ग्रामपंचायत सदस्य अपात्र नियम अतिक्रमण) अपात्र ठरविण्यात येते. (कलम १४ ज).
• राज्य निवडणूक आयोगाने निर्हर (अपात्र) ठरविलेल्या व्यक्ती पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात येते. (कलम १४ क).
• राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने निवडणूकीचा जमा खर्च सादर न केल्यास अशा व्यक्तीस अपात्र ठरविण्यात येते. (कलम १४ ब ).
• ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य शौचालय बांधकाम करून वापर करीत नसल्यास अपात्र ठरविण्यात येते. (कलम १४ ज -५).
• अशी व्यक्ती जी वेडसर किंवा सक्षम न्यायालयाने जीला विकल मनाची म्हणून घोषित असेल त्या व्यक्तीला सरपंच, उपरपंच, सदस्य म्हणून अपात्र राहते. (कलम १४ -ख).
• ती व्यक्ती नादार (दारिद्र्य, दिवाळखोरी) असेल किंवा तीने नादारीतून मुक्तता मिळवली नसेल अशी व्यक्ती ग्रामपंचायतीचे कोणतेही पद धारण करण्यास अपात्र ठरते. (कलम १४ ग).
• कर्तव्यात कसूर केल्यास विभागीय आयुक्तांकडून सदर व्यक्तीला पदावरून काढून टाकण्यात येते. (कलम ३९).
• ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय लागोपाठ ६ महिने बैठकीला गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्य पद अपात्र ठरविण्यात येते. (कलम ४०).
• ग्रामपंचायत मासिक सभा/बैठका न घेतल्यास सरपंच, उपसरपंच पद अपात्र ठरविण्यात येते. (कलम ३६).
• नियमाप्रमाणे सहा ग्रामभांपैकी एकही ग्रामसभा घेण्यास कसूर केल्यास संबंधित सरपंच/उपसरपंच यांना अपात्र ठरविण्यात येते. (कलम ७).
• ग्रामपंचायत अधिनियम कलम १४५ नुसार १२४ व कलम ४५ मधील कामे करण्यास ग्रामपंचायतीने कर्तव्यात कसूर केल्यास ग्रामपंचायत विघटीत/विभाजित करण्यात येते.
• ग्रामपंचायतीचे कोणतेही मालमत्तेची व पैशाची हानी व अपव्यय व दुरुपयोग केल्यास संबंधिताचे पद अपात्र करता येते. (कलम १७८-१).
• शासकीय रक्कमेचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्यास जिह्याधिकारी हे संबंधीतास अपात्र ठरवितात. (कलम १४०-५).
वरीलपैकी कोणत्याही एका कर्तव्यात कसूर केल्यास संबधीत सरपंच, उपसपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य यांना त्यांच्या अधिकारपदापासून दूर करता येते. याबाबतचे अंतिम निर्णय जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे असतात.
ग्रामीण जनतेची कायद्याबाबतची उदासीनता:
ग्रामपंचायतीचा अविभाज्य घटक असेलेली आणि लोकशाहीचा प्रत्यक्ष आविष्कार असलेल्या ग्रामसभेला कायद्याने अधिकचे अधिकार प्राप्त करून दिले आहेत. परंतु, ग्रामीण जनेतेत ग्रामपंचायतीच्या कायद्याबद्दल माहितीचा अभाव दिसून येतो किंवा एखाद्याला कायद्याबाबतची माहिती असूनही ग्रामस्थांचा पाठिंबा किंवा एकजूट नसते. यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकारीद्वारे कायद्यातून पळवाटा काढल्या जातात. असे असले तरीही, शासनाने वेळोवेळो कायद्यात सुधारणा करून जनतेला किंवा ग्रामसभेला अधिक सक्षम आणि बळकटी दिली आहे. जेणेकरून कायद्यातून पळवाटा शोधणाऱ्यांना किंवा गैरकारभार करणाऱ्यांवर आळा बसविला जाऊ शकतो.
वरीलपैकी नमूद बाबींपैकी कोणत्याही एका कर्तव्यात कसूर केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच सदस्य यांना पदावरून कमी करण्यात येऊ शकते. याशिवाय सरपंच व उपसरपंच यांवर अविश्वासाचा ठराव व माहितीचा अधिकार कायदा इत्यादिंचा योग्य रीतीने वापर केल्यास हे चित्र बदलता येऊ शकते. यासाठी ग्रामस्थांची एकजूट आणि कायद्याबतची माहिती असणे ही तितकेच आवश्यक असते.
हे देखील वाचा : सरपंच अविश्वास प्रस्ताव
गावातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना:
• कायदा वाचा, पुन्हा वाचा आणि कायद्याचे नियमही वाचा.
• ग्रामसभेत/मासिक सभेत गावातील सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय प्रथम हाती घ्या. कुणाच्या वैयक्तिक फायद्याचा नको.
• आपले काम पारदर्शक ठेवा. गावातील सर्वांना खुलेपणी सर्व माहिती सांगा. बैठक करताना खुल्या ठिकाणी करा. कोणाच्या घरात, बंद भिंतीमध्ये नको.
• प्रशासन किंवा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आपले शत्रू नाही. त्यांनी नियमानुसार कामे करावे, एवढेच आपल्याला हवे आहे. म्हणून प्रशासनातल्या कोणाशीही बोलताना शिव्या देऊ नका, त्यांचा चुकूनही अपमान करू नका. हळूहळू त्यांच्याशी दोस्ती झाली, तर आपलाच मार्ग प्रशस्त होणार आहे.
• लढत बसणे हे आपले ध्येय नाही. आपल्या गावाचा, समाजाचा एखादा प्रश्न सुटला पाहिजे आणि तोही न्याय मार्गाने, सन्मानाने सुटला पाहिजे हा आपला उद्देश आहे.
• संघटीत होऊनच कायद्याच्या मार्गाने लढा. एकट्याने लढून पुढे जाता येत नाही.
• गावातील विरोधी गटाशी बोला. त्यांना माहिती मिळाल्याने आपले नुकसान होणार नसते, उलट त्यांचे सहकार्य मिळाले तर आपलेच काम सोपे होते.
• जेव्हा फायदा मिळण्याची वेळ येते, तेव्हा आधी गावतल्या सर्वात गरीब माणसांचा विचार करा. फायदा मिळताना त्याचा नंबर पहिला लागला पाहिजे. आपला शेवटी.
• गावातील जुन्या माणसांना, पुढाऱ्यांना, वडीलधाऱ्यांना मान द्या. त्यांना दुखावल्यामुळे आपल्या कामात अडचणी येतात.
• ग्रामपंचायतीची विविध बँक खात्यातील आर्थिक व्यवहारांकडे, शासकीय अनुदाने व ग्रामपंचायत निधीची माहिती ठेवा, यांकडे लक्ष असू द्या.
• ग्रामसभेबाबत जनजागृती करा. विविध संकल्पना राबवून ग्रामस्थांची ग्रामसेभेतील सहभाग वाढवा.
वाचकहो, गावातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक सूचनापैकी असे आणखी काही मुद्दे तुमच्याकडे असतील ज्यामुळे गावकार्यकर्ताला गावाच्या विकासाला चालना देता येईल तर खाली टिप्पणी करून नक्की कळवा तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य अपात्रतेचे निकष, ग्रामीण जनतेची कायद्याबाद्दल असलेली उदासीनता याबाबतही आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.
सी. एम. माने (वकील)
मो. 9850579953
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें